महाराष्ट्र

गरजवंताला अक्कल नसते

(गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांचा पुढाकार)

गरजवंताला अक्कल नसते
(गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांचा पुढाकार)

रघुनाथ थोरात

उंब्रज,ता.कराड पासून पुढे चरेगावकडे जाणाऱ्या पाटण पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. सध्या या कामाची पाहणी केली असता, या परिसरात बऱ्याच ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याचे आढळून येते. तसेच उंब्रज कडून चरेगावच्या दिशेने जाणाऱ्या बाजूची साईड पट्टी भरून न घेतल्यामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतामध्ये ट्रॅक्टर जाण्यासाठी वाट नसल्यामुळे शेतातील मान्सूनपूर्व कामे खोळंबली आहेत. तसेच या ठिकाणी गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही रहिवाशांची घरे रोड लगत असल्यामुळे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत असून आपली दुचाकी तसेच चार चाकी वाहने रस्त्याच्या बाजूलाच पार्किंग करावी लागत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उंब्रज करून चरेगावच्या दिशेने जाणाऱ्या बाजूची साईडपट्टी न भरताच रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प झाल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.दरम्यान,अखेर प्रशासनाच्या या वेळकाढू पणाला कंटाळून,हतबल होत होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही स्थानिक रहिवाशांनी स्वखर्चाने भराव टाकून आपल्या घरासमोरील साईड पट्टी भरून घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ साईडपट्टी भरण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी स्थानिकांसह प्रवाशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button