अखेर.. वैरणचोर रंगेहाथ सापडले

अखेर.. वैरणचोर रंगेहाथ सापडले
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील शेतकऱ्यांच्या शेतातून वैरण चोरी होण्याच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर या सोकावलेल्या वैरण चोरांचं करायचं तरी काय? खाली मुंडी..वर पाय अशा उद्विग्न प्रतिक्रिया पशुपालक शेतकऱ्यांमधून उमटत असतानाच रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास येथील विहिरीचे शेत नावाच्या शेतशिवारात दोन वैरणचोर ऊसाच्या शेतातील वैरण चोरताना रंगेहाथ सापडले. घटनास्थळी दोघेही वैरणचोर वैरण चोरीच्या कामात इतके मग्न झाले होते की,अगदी शंभर फुटांवरून शेताचा मालक आपणास चोरी करताना पाहतोय हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही की याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही.एक तोडत होता तर दुसरा ओझे रचत होता.शेतकऱ्याची चाहूल लागताच दोघांचीही चांगलीच तंतरली.त्यामुळे काढलेली वैरण तिथेच टाकून,हातात ओझं बांधण्याची दोरी घेऊन मोकळ्या हाताने,शरमेने खाली मान घालत घटनास्थळावरून पोबारा करण्याची नामुष्की दोन्ही वैरणचोरांवरती आली. दरम्यान, वैरणचोर निदान एवढ्यावर तरी शहाणे होतील म्हणून चोरांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगायला नको हा सुज्ञ विचार करून शेतकऱ्याने वैरण चोरीचे दृश्य कॅमेराबध्द करण्याचे टाळले तसेच लोकदवंडी न्यूज च्या प्रतिनिधींशी बोलताना वैरणचोरांचे नाव घेण्याचे टाळले.त्यामुळे वैरणचोरांची अब्रू समाजात तोंड दाखवण्याइतपत थोडी का होईना शिल्लक राहिली हे मात्र नक्की…!
जनाची नाही निदान सांप्रदायाची तरी…!
दुसऱ्याच्या शेतात परस्पर वैरण चोरताना जनाची नाही निदान आपण कार्यरत असलेल्या सांप्रदायाची तरी लाज वाटायला हवी होती. नाहीतर लोकासांगे ब्रह्मज्ञान..आपण कोरडे पाषाण हे या ठिकाणी तंतोतंत लागू पडते.एकीकडे हरिपाठ,पूजापाठ करीत परमार्थाचा आभासी देखावा करायचा आणि दुसरीकडे लोकांच्या शेतातील वैरणी चोरायच्या.. हा कसला स्वभाव? मग हा सारा निव्वळ दिखावा समजायचा का लोकांनी? अगोदर अंतरात्म्यातून स्वतःला स्वच्छ करा… आणि मग जगाला तत्त्वज्ञान सांगत फिरा…!त्यामुळे जनाची नाही निदान सांप्रदायाची तरी लाज बाळगा..!




