Uncategorized

कळंत्रेवाडीकरांच्या सौजन्यशील प्रगल्भतेचे दर्शन

मंदिराच्या सभामंडपाचे पावित्र्य जपण्याचा मनोमन निर्धार

कळंत्रेवाडीकरांच्या सौजन्यशील प्रगल्भतेचे दर्शन

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील म्हसोबा-लक्ष्मी ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर ग्रामपंचायतीने भव्य असा सभामंडप बांधला आहे. सभा मंडपाचा वापर हा देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांची बैठक,विविध धार्मिक विधी,पालखी पूजन, भजन कीर्तन यांसारख्या सांप्रदायिक,पवित्र कार्यांसाठी होणे अपेक्षित असताना, सभामंडप बांधण्या पाठीमागील उद्दिष्ट तसे असताना नागरिक सभामंडपामध्ये दुचाकी पार्किंग करून गैरवापर करण्याबरोबरच सभामंडपाचे पावित्र्य धोक्यात आणत असल्याचे दिसून आले होते.आपण दिवसभर आपली दुचाकी गावातील रस्त्यावरील घाणीतून,शेणा-मुतातून, शेतातील चिखलातून फिरवून आणून मंदिर परिसरात कामानिमित्त आल्यानंतर पवित्र अशा सभा मंडपात पार्किंग करत होतो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या मंदिराचे सभा मंडपाचे पावित्र्य धोक्यात येत असल्याबाबतच्या तळमळीतून, अस्वस्थेतून ग्रामदैवतांच्या पवित्र सभामंडपाचं झालयं पार्किंग शेड अशा माथाळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. जेणेकरून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तरी यावरती आत्मचिंतन होऊन नागरिक पवित्र सभामंडपात दुचाकी पार्किंग करायचे बंद करतील. पर्यायाने आपल्या सभामंडपाचे पावित्र्य राखले जाईल निव्वळ एवढाच स्वच्छ हेतू त्या शब्दप्रपंच्या पाठीमागे होता. कारण,आपल्या गावची अस्मिता असलेल्या धार्मिक स्थळांचे, मंदिरांचे पावित्र्य जपणे ही आपली नैतिक,सामाजिक जबाबदारी आहे याचे भान ठेवणे गरजेचे होते.दरम्यान, या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व नागरिकांनी याचा गांभीर्याने विचार करून सौजन्यशील प्रगल्भतेचे दर्शन दिल्याचे चित्र एका प्रसंगातून दिसून आले..
याला निमित्त होते… म्हसोबा-लक्ष्मी मंदिरात सामायिक जागेविषयी बोलवण्यात आलेल्या मिटींगचे..!
मीटिंग सुरू असताना अचानकपणे एक ट्रॅक्टर तिथे आला. नागरिकांनी दुचाकी रस्त्यावर लावलेल्या असल्यामुळे ट्रॅक्टर जाण्यासाठी वाट नव्हती. त्यामुळे नागरिक लगबगीने मीटिंग अर्ध्यावरतीच ठेवून उठले. त्यानंतर रस्त्यावर लावलेल्या आपल्या दुचाकी सभामंडपामध्ये न लावता (….अपवाद वगळता) मोठ्या कसरतीने अरुंद रस्त्यावरतीच इकडे तिकडे करून नागरिकांनी ट्रॅक्टरला वाट मोकळी करून दिली.या प्रसंगरूपी अनुभवातून अंतःकरण सुखावले गेले. कारण मी मांडलेल्या वृत्ताचा चुकीचा अर्थ न घेता नागरिकांनी त्यावरती गांभीर्याने विचार करून मोठ्या सौजन्याने,प्रगल्भतेचे दर्शन घडवीत आपल्या पवित्र सभामंडपाचे पावित्र्य जपण्याचा मनोमन निर्धार केल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button