मंत्र्याच्या बेट्यांची धूमस्टाईल… कोणाचा तरी जीव जाईल…

मंत्र्याच्या बेट्यांची धूमस्टाईल…
कोणाचा तरी जीव जाईल…
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील वार्ड क्रमांक दोन मधील एका गल्लीतील जिगरी दोस्तांना बुडाखाली दुचाकी, चारचाकी घेऊन भेटायला येणारे मंत्र्यांचे बेटे भरधाव वेगाने धूमस्टाईलचा थरार करीत भेटायला येत असल्याने गल्लीतील सामाजिक वातावरण बिघडण्यासोबतच ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे मंत्र्याच्या बेट्यांची धूमस्टाईल.. कोणाचा तरी जीव जाईल.. असे म्हणायची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. सदर गल्लीमध्ये जेष्ठ नागरिक तसेच लहान मुले रस्त्यावरती वावरत असतात. या रस्त्यावरून धुम स्टाईलने,भरधाव बेफाम वेगात, बेदरकारपणे आपल्या गाड्या चालवणाऱ्या या असंवेदनशील, बेजबाबदार बडे बाप की बिगडी हुई अवलादींमुळे मोठी दुर्घटना होऊन अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याबाबत पाठीमागे वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु निर्लज्जम सदासुखी प्रमाणे आचरण करणारे हे टोणगे सुधारायचे नाव घेत नाहीत हे सिद्ध होते. एखाद्या गंभीर दुर्घटनेत कुटुंबीयांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवायची वेळ आल्यानंतरच यांच्या डोळ्यावरील धुंदी जाईल असे वाटते. त्यामुळे गंभीर दुर्घटना होऊन एखाद्याचा जीव गेल्यानंतरच या मंत्राच्या बेट्यांना जाग येणार का? असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
जिगरी दोस्तांनी धूम स्टाईलवाल्या मंत्र्यांच्या बेट्यांना समजावून सांगितले तर बरं होईल..!
या गल्लीत राहणाऱ्या जिगरी दोस्तांनी दुचाकी,चारचाकी मधून धूम स्टाईलने आपल्याला भेटावयास येणाऱ्या मंत्र्याच्या बेटांना समजावून सांगून त्यांच्या बेफाम वेगाला आवर घालावा अशा प्रतिक्रिया येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.




