
उंब्रजमध्ये लिहिला महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
(महिला विक्री केंद्राचे उद्घाटन)
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता.कराड येथे महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय आज उत्साहात लिहिला गेला आहे. क्रांतीज्योती महिला प्रभाग संघ अंतर्गत कोयनेश्वर महिला शेतकरी उत्पादक कंपनी उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने विक्री केंद्राचे भव्य उद्घाटन तसेच नवीन लोगोचे अनावरण सोहळा विशेष दिमाखात संपन्न झाला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम महिलांच्या उद्योजकतेची ठोस पावले मजबूत करणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. अंकुश मोटे सर, तालुका अभियान व्यवस्थापक मा. निलेश पवार सर,तालुका व्यवस्थापक मा.कुंभारदरे सर यांनी उपस्थित राहून नवीन विक्री केंद्राला शुभेच्छा दिल्या.प्रभाग समन्वयक मा.माधवी वनारसे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिला गटांच्या कार्यक्षमतेला नवे दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त झाले.
सोहळ्यात क्रांतीज्योती महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी, मार्तंड महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी, कोयनेश्वर महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक, तसेच सर्व क्रांतीज्योती महिला प्रभाग संघ उंब्रज व मार्तंड महिला प्रभाग संघ पाल यांच्या प्रेरिका,कृषीसखी, एफ.एल.सी.आर.पी.,ग्रामसंघ लिपिका,प्रभाग संघ लिपिका आणि विविध महिला समूहातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. महिलांनी स्वतःच्या हातांनी उत्पादित केलेल्या विविध कृषी व ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी हे केंद्र मोलाचे व्यासपीठ ठरणार आहे.
लोगो अनावरण सोहळ्यात संस्थेची ओळख, ध्येय आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक असलेला नवा लोगो आकर्षणाचे केंद्र ठरला. महिलांनी स्वयंसिद्धी, आर्थिक उन्नती आणि बाजारपेठ विस्तारासाठी घेतलेली ही पुढाकाराची वाटचाल स्थानिक महिला उद्योजिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे पाहुण्यांनी गौरविले.
उद्घाटनाच्या क्षणी सर्वांनी एकच भावना व्यक्त केली—“प्रभाग संघाच्या महिलांची पावले आता विकासाकडे, आत्मनिर्भरतेकडे, आणि नव्या शक्यतांकडे.”
सोहळ्याचा समारोप आनंदमय वातावरणात झाला.



