
मत मागायला आले..अनं चुना लावून गेले
(खाया पिया.. पर कुछ नही दिया)
रघुनाथ थोरात
निवडणूक कार्यकर्ते हे प्रामुख्याने राजकीय सभा,पदयात्रा,कोपरा सभा,प्रचाराचे नारळ वाढवताना, घरोघरी प्रचार करताना आढळतात. अशा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथील सिद्धेश किराणा स्टोअर्सचे मालक,किराणा व्यवसायिक चंद्रकांत थोरात यांच्या बाबतीत एक निराळाच प्रकार घडलायं. दरम्यान,याबाबत चंद्रकांत थोरात यांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेल्या सविस्तर माहिती नुसार,वार रविवार,दुपारी एकच्या सुमारास जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकीतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चार-पाच कार्यकर्ते चारचाकी गाडीतून कळंत्रेवाडीच्या चौकातील सिद्धेश किराणा स्टोअर्समध्ये आले होते. त्यांनी काही खाण्याच्या वस्तू तसेच बिसलरी पाणी बॉटल्स घेतल्या. घेतलेल्या खाण्याच्या वस्तू दुकाना समोरील खुर्च्यांवरती बसून खाल्ल्या, बिसलरीतील पाणी पिले अनं दुकानचे बिल न देताच चारचाकी गाडीच्या काचा वर करून निघून गेले. आपल्या दुकानचे बिल न देताच सदरचे कार्यकर्ते जात आहेत ही गोष्ट चंद्रकांत थोरात यांच्या लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना हाका मारल्या. परंतु,या गोष्टीला खूप उशीर झाला होता.तोपर्यंत कार्यकर्ते चारचाकी मध्ये बसून काचा वर करून केव्हाच निघून गेले होते. सदर व्यक्तींनी ज्या दुकानामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी केल्या त्याच दुकानासमोर त्या वस्तूंचा उपभोग घेतला आणि दुकानदाराचे बाकी असलेले बिल न देताच आपण जात आहोत. ही साधी गोष्ट संबंधितांच्या लक्षात न येणे याला म्हणावे तरी काय..?
…अनं पिकली खसखस
हा प्रकार उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर मत मागायला आले..अनं चुना लावून गेले अशी प्रतिक्रिया नागरिक देत असून या प्रकाराची खसखस नागरिकांमध्ये चांगलीच पिकली आहे.




