महाराष्ट्र

आधुनिक जीवनासाठी योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचे पुनरुज्जीवन…

पुणे ( प्रतिनिधी ) – दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी आधुनिक जीवनासाठी योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचे पुनरुज्जीवन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा बी.पी.सी.ए. शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये युरोपियन योग फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी अमाडिओ बियांची, जीएलजी योग व्हिएतनामचे उपाध्यक्ष डॉ. शिवम मिश्रा, तसेच बी.पी.सी.ए. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मनमत घरोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कार्यशाळेस बॉम्बे फिजिकल अँड कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे व सचिव दीपक शेटे, बी.पी.सी.ए.चे प्रिंसिपल डॉ. घनश्याम ढोकरट, इंटरनॅशनल योगा फेडरेशन दिल्लीचे उपाध्यक्ष सी. वाय. सूर्या, मुंबई योगा असोसिएशनचे सचिव श्री महेश कुंभार व इतर अधिकारी पालघर योगासन स्पोर्ट्स असोसिएशन च्या सचिव रुचिता ठाकूर व पंच, इटली चे गोरिली क्रिस्थीना, बॅस्टिन नियालो मॅथीया, लेव्हराटो डेनि, ग्लूसी लेडे बंगलोर चे अ‍ॅडव्होकेट विनय सिंग, शिक्षणतज्ज्ञ, योग अभ्यासक, शारीरिक शिक्षक, संशोधक, आरोग्य व्यावसायिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना स्वामी अमाडिओ बियांची यांनी सांगितले की, युरोपमध्ये शांतता आणि मानसिक समतोलासाठी योगाची अत्यंत गरज आहे. योग हे स्वतःकडे जाण्याचे एक प्रभावी साधन आहे. आपण १४ दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, परंतु काही क्षणांपेक्षा जास्त काळ श्वासाशिवाय राहू शकत नाही; तरीही आपण अन्नाचा विचार करतो, पण श्वासाचा का करत नाही?
“मी कोण आहे? माझे या जगात काय योगदान आहे? आणि मृत्यूनंतर माझे काय उरेल?” असे आत्मचिंतनात्मक प्रश्न योग आपल्याला विचारायला लावतो. योगाच्या माध्यमातून आपण वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. शिवम मिश्रा यांनी योगासनांची शास्त्रीय प्रात्यक्षिके सादर करताना योगाभ्यासामागील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांनी अनुभव कथन, सर्वोत्तम पद्धतींचे आदान–प्रदान तसेच संवादात्मक चर्चेद्वारे सर्वांना सक्रिय सहभागी करून घेतले.


योग ही एक प्राचीन, सर्वांगीण विद्याशाखा असून तिची मुळे योगसूत्रे, उपनिषदे व भगवद्गीता यांमध्ये वर्णन केलेल्या भारतीय तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेली आहेत. पारंपरिक अर्थाने योग ही केवळ व्यायामपद्धती नसून, एक संपूर्ण जीवनशैली आहे जी शारीरिक शिस्त, मानसिक स्पष्टता, नैतिक जीवनमूल्ये आणि आध्यात्मिक जागृती यांचे समन्वय साधते.
तणाव, जीवनशैलीजन्य आजार, भावनिक असंतुलन आणि सामाजिक विघटनाने ग्रासलेल्या आधुनिक जगात, योगाच्या शास्त्रीय पाया पुन्हा समजून घेणे आणि त्याची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आधुनिक समाजाला शास्त्रीय योगाच्या अस्सल तत्त्वज्ञानाशी पुन्हा जोडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या औचित्याने योगासन भारत यांच्या शिफारशीनुसार, २५ जानेवारी २०२६ (रतसप्तमी) ते १९ फेब्रुवारी २०२६ (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रव्यापी सूर्यनमस्कार अभियानाअंतर्गत बी.पी.सी.ए. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button