Uncategorized

नेमकी कुठे माशी शिंकली?..गाळ काढण्याची प्रक्रिया थांबली..

(नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा)

*नेमकी कुठे माशी शिंकली?..*
*गाळ काढण्याची प्रक्रिया थांबली..*

(नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा)

रघुनाथ थोरात

चाफळ,ता पाटण नजीक
उत्तरमांड मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. उत्तर मांड नदीवर बांधण्यात आलेल्या या मध्यम प्रकल्पाच्या धरणामुळे गमेवाडी पासून उंब्रज पर्यंतचा परिसर सुजलाम सुफलाम झाला. गमेवाडी पासून उंब्रज पर्यंत जवळपास १३ केटी बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे कळंत्रेवाडी येथील केटी बंधारा.

*कळंत्रेवाडी केटी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ..!*

हा बंधारा नेहमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. बंधाऱ्याच्या बांधकामास खूप वर्षांचा कालावधी लोटला आहे. बंधारा बांधल्यापासून आजपर्यंत सनदशीर मार्गाने योग्य त्या कागदपत्रांचे सोपस्कार तसेच आवश्यक त्या महसुली परवानग्या घेऊन कधीही बंधाऱ्यात साचलेल्या गाळाचा उपसा करून बंधारा खोलवला नसल्यामुळे बंधाऱ्यातील सद्यस्थिती पाहता बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे आढळून येते.साधारणपणे आठ ते दहा फूट गाळ साचल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाहिजे तसा पाणीसाठा होऊ शकत नाही. साहजिकच त्याचा परिणाम सिंचनासाठी पाणी उपसा तसेच पिकांवर होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न घेता येत नाही. साहजिकच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

*जलजीवन योजनेच्या प्रकल्पाला फटका बसण्याची शक्यता…!*

सदर बंधाऱ्यालगत केंद्र सरकारच्या हर घर जल या महत्वाकांक्षी जलजीवन योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे.बंधाऱ्यातील गाळ जर काढला नाही तर जलजीवन योजनेला फटका बसून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

*बंधाऱ्यातील मोटारी चोरी जाण्याची शक्यता कैकपटीने वाढली…!*

अलीकडील काळात बंधाऱ्यात पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची संख्या वाढल्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन विद्युत मोटारी उघड्या पडतात.त्यामुळे विद्युत मोटारी चोरी जाण्याचा धोका कैकपटीने वाढला आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

*बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कागदोपत्री सोपस्करांची प्रक्रिया अचानकपणे थांबली….!*

दरम्यान,चालू वर्षी उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचा गाळ काढण्यासाठी महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले.त्यानुसार आवश्यक असणाऱ्या ग्रामपंचायत ठरावाचे पत्र देखील काढण्यात आले.परंतु,त्यानंतर पुढील कागदोपत्री पाठपुरावे,सोपस्कार अचानकपणे थांबल्याचे नागरिक सांगत असून नेमकी माशी कुठे शिंकली? बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कागदोपत्री सोपस्काराची प्रक्रिया का थांबली? अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

*प्रशासनाकडे आवश्यक तो कागदोपत्री पाठपुरावा करण्यास आम्ही तयार…!*

त्यामुळे आवश्यक तो कागदोपत्री पाठपुरावा करण्यास आम्ही तयार आहोत.महसूल प्रशासनाने बंधाऱ्याची स्थळपाहणी करून लवकरात लवकर बंधाऱ्यातील गाळ काढण्याची प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी हणमंत थोरात,राजेंद्र थोरात,रणजीत थोरात,जगन्नाथ थोरात,शिवाजी येळवे,दिपक थोरात,विक्रम थोरात,अमोल थोरात आदि शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button