चरेगावच्या फरशी पुलाला डागडुजीची गरज
(सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; गंभीर दुर्घटनेची शक्यता)


चरेगाव:येथील फरशी पुलाला गत आठवड्यात पडलेले भगदाड

चरेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने फरशी पुलाला पडलेले भगदाड स्वखर्चाने मुजवले
चरेगावच्या फरशी पुलाला डागडुजीची गरज
(सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष; गंभीर दुर्घटनेची शक्यता)
उंब्रज/प्रतिनिधी
चरेगाव,ता.कराड गावच्या हद्दीत उत्तरमांड नदीवर बांधण्यात आलेल्या फरशी पुलावर सतत खड्डे पडत असल्यामुळे पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून कायमस्वरूपी भक्कम डागडूजी करण्याची गरज आहे. परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी गंभीर दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सदरचा पूल ओलांडूनच गावामध्ये जावे लागत असल्याने गावच्या मुख्य रहदारीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.दरम्यान,याबाबत गावचे सरपंच देवदत्त माने यांच्याकडून माहिती घेतली असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामपंचायतीने पुलाच्या डागडुजी संदर्भात वारंवार लेखी,तोंडी पाठपुरावे केले आहेत. परंतु,सार्वजनिक बांधकाम विभाग सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे सरपंच देवदत्त माने यांनी सांगितले. सध्या पावसाळा सुरू आहे. गत आठवड्यात अचानकपणे सदर पुलावर मोठे भगदाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर सरपंच देवदत्त माने यांनी तातडीने पावले उचलून पुलावर पडलेले भगदाड मुजवून घेत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक खुली केली आहे.परंतु, पुलाची दयनीय अवस्था झाल्यामुळे कायमस्वरूपी डागडुजीची गरज आहे. तसेच पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असते. भवानवाडी,पवार मळा मार्गे अथवा धर्मशाळेकडून येणाऱ्या रस्त्याचा पर्यायी वापर करावा लागतो.त्यासाठी पुलाची उंची वाढवणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून पुलाची उंची वाढवून भक्कम डागडुजी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट
सार्वजनिक बांधकामकडून पाठपुराव्याला अद्यापही यश नाही..!
पुलाची डागडुजी करण्यासंदर्भात मी व्यक्तिगत केलेल्या पाठपुराव्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून म्हणावा असा प्रतिसाद नसल्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री देवदत्त पतंगराव माने (सरपंच-चरेगाव)




