उंब्रज परिसरात धुमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ
नागरिकांनी सतर्क राहावे:सपोनि रविंद्र भोरे यांचे आवाहन

उंब्रज परिसरात धुमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ
(महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे लांबवली)
उंब्रज/प्रतिनिधी
अंधारवाडी,ता.कराड गावच्या हद्दीतील गावच्या प्रवेशद्वारावरील कमानीपासून अलीकडील बाजूस असलेल्या वळणावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ०६.५५ च्या सुमारास घडली. तसेच शिवडे,ता.कराड गावचे हद्दीत सर्विस रोडवरील पुलावर मॉर्निंग वॉक साठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना सकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान,याबाबतची फिर्याद मनीषा शहाजी कदम वय-४५ रा. उंब्रज यांनी उंब्रज पोलिसात दिली आहे.या दोन्हीं घटनांमुळे उंब्रज परिसर हादरून गेला आहे. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक १० जुलै रोजी सकाळी ०६.१५ वाजण्याच्या सुमारास मनीषा शहाजी कदम या आपली मैत्रीण रोहिणी मारुती साळुंखे यांच्या समवेत अंधारवाडी हद्दीत कमानीच्या अलीकडील वळणावर मॉर्निंग वॉक करत असताना समोरून काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकल वरून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी गाडी जवळ येऊन थांबवली. त्यातील एकाने खाली उतरून चाकूचा धाक दाखवत मनीषा कदम यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर दुसऱ्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत उंब्रजच्या दिशेने पोबारा केला. दरम्यान,त्यावेळी मनीषा कदम यांनी आरडा ओरडा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चाकू लागला आहे. त्यानंतर मनीषा शहाजी कदम या फिर्याद देण्यासाठी उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये आल्या असता समजले की, त्याच तीन अनोळखी इसमांनी अपूर्वा आकाश अर्जुगडे व त्यांच्या सासूबाई सुनिता विजय अर्जुगडे या शिवडे सर्विस रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने चोरून नेहले आहे. दरम्यान, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरीस गेलेल्या दागिऱ्यांमध्ये जवळपास ८०,०००/- हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे गंठण,१,००,०००/-लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे गंठण, जवळपास १,२०,०००/-रुपये किमतीचे तीन तोळ्याचे गंठण आदि दागिन्यांचा समावेश आहे. अधिक तपास पीएसआय ठाणेकर हे करीत आहेत.
चौकट
नागरिकांनी सतर्कता बाळगावी…!
उंब्रज परिसरातील नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाताना आपले मौल्यवान दागिने घालू नयेत. तसेच सतर्क राहून आपल्या आसपास एखादी संशयास्पद व्यक्ती,हालचाल आढळून आली तर घाबरून न जाता मला ९०११०८७३९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सपोनि रविंद्र भोरे(उंब्रज पोलीस स्टेशन)



