ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतीचे शेकडो लिटर पाणी रस्त्यावर
(लिकेजची समस्या कायम; नागरिक बेहाल)

ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतीचे शेकडो लिटर पाणी रस्त्यावर
(लिकेजची समस्या कायम; नागरिक बेहाल)
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील ग्रामपंचायतीचे शेकडो लिटर पाणी पाटण पंढरपूर राज्य मार्गावर वाया जात असून संबंधित कुटुंबांनी चार ते पाच वेळा पाईपलाईनचे लिकेज काढून देखील या ठिकाणची पाईपलाईन लिकेजची समस्या अद्यापही सुटलेली नाही.त्यामुळे ग्रामपंचायतीने रस्ता क्रॉस करून पाईपलाईन करून देण्याची मागणी सदर कुटुंबांनी केली आहे.दरम्यान,याबाबत बाधित कुटुंबांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईन ही रस्त्याच्या पलीकडील बाजूस असून संबंधित कुटुंबांनी स्वखर्चाने रस्ता क्रॉस करून पाईपलाईन आणली आहे. सदर पाईपलाईन ही जास्त खोल नसून पीव्हीसी मध्ये केली आहे.सध्या पाटण पंढरपूर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून खुदाई करताना पाईपलाईन लिकेजची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या ठिकाणी लोखंडी पाईपलाईन वापरून तिला कव्हरिंग करणे आवश्यक आहे. तरच लिकेजची समस्या कायमस्वरूपी निकालात निघू शकते असे संबंधित कुटुंबांचे म्हणणे असून ग्रामपंचायतीने रस्ता क्रॉस करून आमच्या घरापर्यंत पाईपलाईन करावी अशी मागणी या कुटुंबांनी केली आहे. दरम्यान,या ठिकाणी वारंवार उद्भवणारी लिकेजची समस्या ही अधिकच जटील बनली असून त्यामुळे ग्रामपंचायतीचे शेकडो लिटर पाणी ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर वाया जात असल्याचे चित्र आढळून येत आहे.
चार दिवस झाले पाण्याविना हाल..
पाईपलाईन लिकेज होऊन जवळपास चार दिवस झाले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नसल्याने पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया सदर कुटुंबं देत आहेत.




