Uncategorized
आता.. शिवाजीनगरवर राहणार सीसीटीव्हीचा वॉच
(सपोनि रविंद्र भोरे यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीचा निर्णय)

आता.. शिवाजीनगरवर राहणार सीसीटीव्हीचा वॉच
(सपोनि रविंद्र भोरे यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीचा निर्णय)
रघुनाथ थोरात
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. ते सुरक्षा व संरक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारी रोखण्यास, मालमत्तेचे संरक्षण करण्यात मदत होते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर आजकाल घरांमध्ये व्यावसायिक ठिकाणी,सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. सीसीटीव्हीमुळे लोकांना सुरक्षित वाटते,फुटेज गुन्हेगारी तपासात उपयोगी पडतात,चोरी,गैरवर्तन रोखता येते या सर्व गोष्टींचा विचार करून कराड तालुक्यातील शिवाजीनगर (मांगवाडी) ग्रामपंचायतीने गावामध्ये ठिकठिकाणी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित केली आहे.त्यामुळे शिवाजीनगरवर आता चोवीस तास सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या सूचनेनुसार तसेच गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सरपंच सौ सुरेखा पवार यांनी सांगितले. यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून जवळपास ४० हजार निधीची तरतूद करण्यात आली असून मारुती मंदिर,ग्रामपंचायत कार्यालय,गावचे मुख्य प्रवेशद्वार, जिल्हा परिषद शाळा परिसर आदि ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कामी गावचे पोलीस पाटील शंकर घाडगे तसेच तत्कालीन ग्रामसेविका पल्लवी देसाई यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी सांगितले.




