
स्मार्ट मीटर बसवू नका… अन्यथा खळखट्याक
(मनसेचा उंब्रज महावितरणला ईशारा)
उंब्रज/प्रतिनिधी
उंब्रज,ता.कराड येथील महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये महावितरणने स्मार्ट मीटर बसू नयेत. अन्यथा मनसेच्या खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने उंब्रज महावितरणला दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर संदर्भात उंब्रज परिसरात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. आपण स्वतः व आपल्या कार्यालयाकडून डिजिटल मीटरचे अधिकार आमच्याकडे राहिले नाहीत असे सांगून स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहेत. ग्राहकांना स्मार्ट मीटर गरजेचे नसून पूर्वीचे डिजिटल मीटर हवे आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी चुकीची माहिती देऊन मीटर बसवण्यास भाग पाडू नये. सद्यस्थितीत ज्यांचे पूर्वीचे मीटर खराब झाले आहेत किंवा ज्यांना नव्याने मीटर बसवायचे आहेत त्यांना डिजिटल मीटर बसवण्याचे अधिकार आमच्याकडे राहिले नाहीत असे सांगून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी भाग पाडले जात आहे. स्मार्ट मीटर हा वीज ग्राहकांचा ऐच्छिक विषय असून त्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये तसेच आपण यापूर्वी उंब्रज व उंब्रज महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ज्या ज्या गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवले आहेत ते आठ दिवसांच्या आत काढण्यात यावेत. तेथे डिजिटल मीटर बसवण्यात यावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस आपण उपकार्यकारी अभियंता या नात्याने जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी. तसेच उंब्रज महावितरण कार्यालयात अनेक वेळा अधिकारी,कर्मचारी वेळेवरती येत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या असून हालचाल रजिस्टरवर योग्य प्रकारे नोंदी नाहीत. तसेच आपल्या निवासाची सोय महावितरण कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे. त्यासाठी शासन लाखो रुपयांचा खर्च करत आहे. मात्र तेथे कोणतेही अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे वीज ग्राहकांची कामे तातडीने होत नाहीत. अनेक दुर्घटना होऊन नागरिकांना जीवितास मुकावे लागते. अशा आजवर अनेक घटना घडल्या असून नेमणुकीच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुक्कामी रहावे अन्यथा मनसेच्या वतीने खळखट्याक आंदोलन केले जाईल. यावेळी सातारा जिल्हा सचिव अमोल कांबळे, तालुकाध्यक्ष रणजीत कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी आदी मनसैनिक उपस्थित होते.




