सणासुदीच्या काळामध्ये बाहेरगावी व खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे
उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे यांचे आवाहन

सणासुदीच्या काळामध्ये बाहेरगावी व खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे:सपोनि रविंद्र भोरे
रघुनाथ थोरात
दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी व बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी योग्य त्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे आवाहन उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे यांनी केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपापल्या गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात अशा काळामध्ये चोऱ्या तसेच घरफोड्या होण्याच्या घटना घडत असतात. बाहेरगावी जाताना घरमालक तसेच व्यापारी आणि दुकानदार यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोन्या-चांदीचे दागिने , रोख रक्कम व मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँक लॉकर किंवा आपल्या सोयीनुसार सुरक्षित ठिकाणी ठेवावे तसेच आपली दुचाकी व चार चाकी वाहने सुद्धा सुरक्षित लॉक करून ठेवावी. परिसरात कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करावी . एसटी स्टँड परिसरामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या बॅगेतील सोने किंवा आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या ह्या चोरीला जाणार नाहीत याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही पोलिस आहोत आपल्या हातातील किंवा आपल्या गळ्यातील सोन्याची वस्तू काढून द्या आम्ही तुम्हाला ती पुडीत बांधून देतो असे म्हणणाऱ्या गुन्हेगारांच्या पासून सावध राहावे. तसेच मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या सर्व नागरिकांनी शक्यतो किमती वस्तू गळ्यामध्ये घालू नये व ग्रुपनेच फिरण्यासाठी जावे जेणेकरून आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने कोणताही गुन्हेगार ओढून घेऊन पळून जाणार नाही. उंब्रज पोलीस ठाण्याच्या वतीने उंब्रज पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेळोवेळी नाकाबंदी राबविण्यात येत असून पेट्रोलिंग देखील वाढविण्यात आलेले आहे. अशी माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे यांनी दिली आहे.




