
उमेश्वर सुरू करण्याचा नूतन संचालक मंडळाचा निर्धार
(थकबाकी भरण्याचे केले आवाहन)
रघुनाथ थोरात
कराड तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार आदरणीय कै श्री पी डी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली, उंब्रज आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचा वाटा असलेली श्री उमेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था तब्बल ३२,०५,१८४ इतक्या थकबाकीच्या फुगवट्यामुळे बऱ्याच कालावधीपासून बंद अवस्थेत आहे.काही महिन्यांपूर्वी उमेश्वर संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली असून नूतन संचालक मंडळ उमेश्वरचा कारभार पाहणार आहे. त्यानुसार उमेश्वर संस्थेला थकबाकीच्या विळख्यातून बाहेर काढून संस्था सुरळीतपणे पूर्ववत करण्याचा निर्धार नूतन संचालक मंडळाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सभासदांच्या भेटीसाठी गाव भेट दौरे आयोजित करून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी मौजे कळंत्रेवाडी येथे सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन धोंडीराम बर्गे तसेच संचालक धिरज थोरात यांनी उमेश्वरची पुढील भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना व्हॉइस चेअरमन धोंडीराम बर्गे म्हणाले की, आम्ही संस्थेला पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने पावले उचलत असून संस्थेची आजमितीस थकबाकी जवळपास ३२ लाख ५ हजार १८४ इतकी असून संस्था सुरू करण्यासाठी जवळपास २० ते २२ लाखांच्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. त्यामुळे सभासदांनी आपली थकबाकी भरून संस्थेस सहकार्य करावे. यावेळी सभासदांनी संचालक मंडळासमोर मांडलेल्या अडी अडचणींचे,प्रश्नांचे निरसन करण्यात आले. दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी गावातीलच दोन व्यक्ती नेमले असून सभासदांनी त्यांच्याकडे आपल्या थकबाकीचे पैसे जमा करावेत असे सांगण्यात आले. काही सभासदांनी उमेश्वर संस्था बंद झाल्यामुळे अल्पभूधारक, सर्वसामान्य शेतकऱ्यावर किती बिकट परिस्थिती ओढवली आहे हे सांगत उमेश्वर सुरू होणे किती गरजेचे आहे हे पोटतिडकीने मांडले.उमेश्वर संस्था बंद झाल्यानंतर गावातील मुठभर धनदांडग्या,भांडवलदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून खाजगी पाईपलाईन्स केल्या.परंतु, सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी खऱ्या अर्थाने देशोधडीला लागला हे सांगताना सभासदांचे डोळे पाणावले. शेवटी उमेश्वर संस्था काहीही करून सुरू करण्याचा निर्धार करीत थकबाकी लवकरच भरण्याचे आश्वासन सभासदांनी दिल्यानंतर बैठक समाप्त झाली.यावेळी उमेश्वरचे व्हाईस चेअरमन धोंडीराम बर्गे, संचालक धिरज थोरात,अशोक भोसले,सरपंच शंकर बाकले, उपसरपंच दिलीप यादव तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




