उंब्रज पोलिसांच्या तत्पर कारवाईने अपहरणातील संशयितास अटक

उंब्रज पोलिसांच्या तत्पर कारवाईने अपहरणातील संशयितास अटक
(गोवा पोलिसांच्या स्वाधीन)
गोवा राज्यातील दक्षिण गोवा येथील वेरना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितास उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेऊन गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातील पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दिनांक २२ मे २०२५ रोजी वेरना पोलिस ठाण्यात गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी हा सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तात्पुरता रहिवासी असल्याची गोपनीय माहिती वेरना पोलिसांनी उंब्रज पोलिसांना दिली.
या माहितीची गंभीर दखल घेत, उंब्रज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी तत्काळ तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत, पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितास मल्लाप्पा शांताप्पा ओडी (वय २१) याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार रोहित पाटील, संजय धुमाळ आणि सचिन मुळे यांनी केली. या कार्यवाहीबद्दल पोलिस विभागात त्यांचे कौतुक होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या तत्परतेचे आणि जागरूकतेचे कौतुक केले असून, अशा कार्यवाहीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा धाक टिकून राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.



