Uncategorized

कै आप्पा…! कष्ट अन् संघर्षाचा महामेरू

कै आप्पा…!
कष्ट अन् संघर्षाचा महामेरू

रघुनाथ थोरात

मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही युक्ती सार्थ करणारी व्यक्तिमत्वे ही काहीशी दुर्मिळच असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाने मरणोत्तर देखील जनमानसाच्या हृदयात अजरामर असतात. ज्यांच्या जीवन पटावर काहीतरी लिहावं असं वाटतं त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे चुलते कै अशोक शंकर थोरात. लोक त्यांना आदराने आप्पा म्हणत. आप्पांनी आयुष्यात उपसलेले अपार कष्ट आणि केलेल्या संघर्षाच्या जोरावर आजही ध्रुव तार्‍याप्रमाणे त्यांचे जनमानसातील आढळस्थान कायम आहे. जवळपास आठ वर्षांपूर्वी म्हणजे 18 मार्च 2018 रोजी झालेल्या अपघातामध्ये आप्पांचे 21 मार्च 2018 रोजी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी निधन झाले.आप्पांचे असे अकाली जाणे हा त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावासाठी खूप मोठा धक्का होता. कारण तहहयात कष्टात घालवलेल्या आप्पांचा असा दुर्दैवी मृत्यू होणं ही गोष्ट मनाला चटका देणारी होती. आप्पा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी कडवी झुंज देत होते. तोंडावरती असलेला हिंदूंचा मंगलमय पवित्र असा गुढीपाडव्याचा सण झाल्यानंतर दोनच दिवसात आप्पांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणा दिवशी आप्पांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाही.आज 19 मार्च 2026 गुढीपाडव्याचा सण,कालपासून आप्पांच्या आठवणींनी काळीज पिळवटून निघत होते. मन मोकळ करण्यासाठी त्या आठवणी शब्दात मांडण्याचे ठरवले. त्याच्यासाठी हा लेख प्रपंच…!

कराड तालुक्यातील उंब्रज नजीक असलेल्या कळंत्रेवाडी या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आप्पांचा जन्म झाला. अंगीभूत असलेल्या कष्टाळू पिंडामूळे आप्पा शाळेत रमलेच नाहीत. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आप्पांनी मिल्ट्री भरतीसाठी प्रयत्न केले.परंतु,त्यात त्यांना यश आले नाही.अखेर हताश न होता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आप्पा अहोरात्र शेतीत घाम गाळत होते. अशातच 5 मार्च 1991 रोजी त्यांचा विवाह विटा परिसरातील तुपेवाडी येथील कै सिताराम आनंदा यादव यांची कन्या संगीता यांच्याशी चाफळ येथील राम मंदिरात झाला. उपजतच कष्टाळू बाणा असलेल्या पत्नीमुळे आप्पांच्या कष्टाळूपणाला आणखीनच बळकटी मिळाली. आप्पा व संगीता काकींच्या संसारवेलीवर गौरी व अविनाश ही दोन फुले फुलली.कालांतराने स्वाभाविकपणे, निसर्गनियमांनुसार कुटुंब विभक्त झाले.आप्पा बैलाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर कसत.शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून तसेच बैल औतकाठीच्या कामांतून येणाऱ्या भाड्यातून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याबरोबरच शेती व मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना या दाम्पत्त्याची अक्षरशः तारेवरची कसरत होत होती. वडिलांनी केलेल्या आर्थिक मदतीतून तसेच घराचे बांधकाम करणारे सांगली जिल्ह्यातील नागठाणे गावचे सुतार मिस्त्री यांच्या हाताखाली काम करून या दाम्पत्याने घराचे काम पूर्ण केले. तसेच औतकाठीच्या कामातून येणाऱ्या भाड्यातून घराजवळ गोबर गॅस बांधल्याचे व त्यासाठी दिवसभर शेतात राबायचे व रात्रभर जागून खड्डा काढायचा अशा पद्धतीने गोबर गॅसचे काम पूर्ण केल्याचे यावेळी बोलताना संगीता काकींनी सांगितले. गावातील कोणतेही सार्वजनिक काम असो,ऊस वाहतुकीला रस्ता करणे असो अथवा सार्वजनिक विहिरीवरील मोटर पाईपलाईन या संदर्भात कोणतेही शारीरिक कष्टाचे अवजड काम असो. प्रत्येक कामात आप्पा आघाडीवर असत. पाच हॉर्सपॉवरची विद्युत मोटर एकट्याने स्वतः खांद्यावरती घेऊन विहिरीतून बाहेर काढल्याच्या प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. कष्टाचा पिंड असल्यामुळे कष्टाची कामे करताना ते अजिबात कचरले नाहीत. सामायिक विहिरीतील कामे करताना ते म्हणायचे,तुम्ही बाजूला व्हा.. मी बघतो काय करायचं ते. इतका प्रचंड कष्टाळूपणा असलेलं हे व्यक्तिमत्व होतं.उपवासा दिवशीही शेतातील राबवणुकीला आप्पांकडून खंड पडत नसे. मग कधी कधी फराळ आणायला पैसे नसायचे त्यामुळे दिवस दिवस फक्त चहा पिऊन जनावरासारखे शेतात राबून दिवस काढावे लागले. प्रसंगी गावातील इतर शेतमजुरांबरोबर दुसऱ्याच्या शेतात रोजगार केला.काही वेळा तर पोटच्या मुलांना किर्र अंधाऱ्या रात्रीत शेताच्या सरीत झोपवून रात्र रात्रभर शाळू उपटला. आज आम्ही गावातच ह्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये जायला मोटरसायकल वापरतो.परंतु,आप्पा जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर शिवाजीनगर हद्दीत असलेल्या त्यांच्या चिजदरा नावाच्या शेतशिवारात ये-जा करण्यासाठी पायपीट करीत.आप्पा नेहमी चिजदरा,आरसाड,बांधाणे,दहाबिगे या दुरवरच्या रानांतून डोक्यावरूनच वैरणीची ओझी आणत. एकदा तर घरात भाताला तांदूळ नव्हते. शोधा शोध केल्यानंतर तांदळाची कणी सापडली.ती पाण्यात भिजवली आणि कोणीतरी हाक मारली म्हणून बाहेर गेली. नंतर येऊन बघते तर भिजवलेली तांदळाची कणी खरकटे पाणी समजून गौरीने बाहेर ओतून दिली होती. पोटातल्या आगीमुळे उत्पन्न झालेली चीड पोटच्या गोळ्याला मारहाण करण्यात परावर्तित झाली. असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांतून या दाम्पत्याच्या कष्टप्रद,संघर्षमय आयुष्याची कल्पना येते. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील आप्पांचे स्थान अढळ ध्रुवाप्रमाणे आहे. माझे पप्पा घरी नव्हते. माझा लहान भाऊ विशाल याचे लग्न ठरले. त्या मंगल कार्यात गिरणीतून दळणे दळून आणण्यापासून लग्न झाल्यानंतर ग्रामदैवतांसमोर घ्यावयाचे दंडस्थान आप्पांनी त्या रखरखत्या उन्हात घेतले. कोणत्याही मानपानाची अपेक्षा न ठेवता पडेल ते काम केले. त्यामुळे माझे लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडले. मला माझ्या वडिलांची कमतरता भासू दिली नाही.हे माझ्या आयुष्यातील आप्पांचे योगदान कधीही न विसरता येण्याजोगे आहे. आप्पांची मुले आता मोठी झाली होती. गौरीने बीएससीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते तर अविनाशचे मिल्ट्री भरतीचे प्रयत्न सुरू होते. हे दाम्पत्य आता आयुष्याच्या उत्तरार्धातील जबाबदाऱ्या पूर्ण करून दोन्ही मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी प्रयत्नशील असताना या दाम्पत्याच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक? या कुटुंबाने विचार सुद्धा केला नसेल की हा प्रसंग आपल्या कुटुंबाच्या ढाच्यालाच हादरा देऊन जाईल.18 मार्च 2018 ची सकाळ उजाडली. या कुटुंबाला पुसटशी देखील कल्पना नव्हती की, हा दिवस आपल्यासाठी काळा दिवस ठरेल,आपला वाघासारखा पती आपल्यापासून हिरावून घेईल, आपला देवासमान बाप काळाच्या पडद्यावर जाईल. आज आप्पा जेसीबी घेऊन चिजदर्यात गेले होते. दिवसभर शेतात राबून सायंकाळी सहा वाजता ते घरी आले. घरी येताच त्यांनी संगीता काकींना चहा ठेवायला सांगितले. गॅसवर ठेवलेल्या चहाला उकळी येतेच न येते तोपर्यंत झालेल्या भाड्याचे पैसे देण्याबाबत जेसीबी वाल्याचा फोन आला. दरम्यान, पटकन चहा दे मला जेसीबी वाल्याचे पैसे भागवायला उंब्रजला जायचे आहे असे म्हणत आप्पांनी उकळता चहा उभ्या उभ्याच घाई गडबडीने पिला अन् अंगातील शर्टाची बटणे लावतच गाडीला किक मारून उंब्रजच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, केवळ दोन ते तीन मिनिटेच झाली असतील जाधव पेट्रोल पंपासमोर आप्पांच्या मोटरसायकलचा अपघात झाला.आप्पा जागीच कोसळले. आप्पांच्या गाडीला अपघात झाल्याचा निरोप कोणीतरी पाठवल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. आप्पांना तात्काळ 108 ॲम्बुलन्स मधून कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रथमदर्शी आप्पांचा चेहरा पाहता फक्त उजव्या भुवयीजवळ जखम झाली होती. डोक्याचा सिटीस्कॅन केल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला असून तात्काळ ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार तात्काळ ऑपरेशन करण्यात आले.परंतु,आप्पांच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही तर प्रकृती ढासळत चालली होती.अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजे 21 मार्च 2018 रोजी आप्पांचे दुर्दैवी निधन झाले. कर्त्या पुरुषाच्या जाण्यानं एक बहरलेलं हसतंखेळतं कुटुंब उघड्यावरती पडलं.हा प्रसंग सांगताना संगीता काकींनी आत्तापर्यंत गिळलेल्या आवंढ्याला वाट मोकळी करून दिली अन् अश्रूंचा बांध फुटला.कै आप्पांच्या कष्टप्रद आयुष्याच्या संघर्षमय काळात खांद्याला खांदा लावून प्रपंचाचा गाडा हाकताना हृदयात खोलवर जखमा करून गेलेल्या अनेक वेदनामय प्रसंगांना उजाळा देताना ही लढवय्यी दुर्गा, माऊली भूतकाळाच्या अंधारात हरवून गेल्याचे,मानसिक दृष्ट्या खचल्याचे दिसून आले. लाथ मारेल तिथे पाणी काढणारा वाघासारखा भर्तार,कुटुंबाचा कर्ताधर्ता ऐन उमेदीच्या काळात प्रपंचाच्या सारीपटावरून उरलं सुरलं फाटकं वेदनादायी आयुष्य जगण्यासाठी बायको पोरांना सोडून अचानकपणे निघून जातो.अन् कोरड्या रूक्ष आयुष्यात स्वार्थाने बरबटलेल्या भामट्या दुनियेत पोरा बाळांचे संगोपन करीत संसाराचा गाडा हाकणे हे निश्चितच सोपी गोष्ट नाही तर त्यासाठी जातीचं असावं लागतं. मित्रांनो, खरं सांगू का..! आजकालच्या या स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत कुणीच कुणाचं नसतं. मृतकाचे दहनविधीपासून चौदाव्यापर्यंतचे संस्कार पार पडल्यानंतर ते कुटुंब जगलयं का मेलयं, कोणत्या परिस्थितीतून जातयं हे वाकून पाहण्यासाठी सुद्धा कोणाकडे वेळ नसतो. आप्पांच्या अकाली जाण्याने उपजतच लढाऊ बाण्याचे बाळकडू असलेली ही माऊली खचली नाही.तिने स्वतःचे अश्रू स्वतःच पुसले,कंबर कसली अन् आता रडायचे नाही तर लढायचे असा निर्धार करीत आपण जन्माला घातलेल्या दोन पोटच्या गोळ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य तसूवरही कमी न होण्यासाठी, त्यांचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी आप्पांनी दिलेल्या कष्ट अन् संघर्षाच्या मार्गावर आजही ती अहोरात्र झगडत आहे…!
याप्रसंगी मला कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी आठवतात. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..

मराठमोळ्या मंगलमय गुढीपाडव्याच्या सणानिमित्त माझ्याकडून कै आप्पांना भावपूर्ण शब्दसुमनांजली…

🙏😢

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button