सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पालखी सोहळा दत्त मंदिरात विसावला
(पाटील बंधूंकडून दिंडीचे स्वागत)


सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पालखी सोहळा दत्त मंदिरात विसावला
(पाटील बंधूंकडून दिंडीचे स्वागत)
रघुनाथ थोरात
सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर हे एक प्रसिद्ध कीर्तनकार व संत होते.ते वसंतगड संस्थानचे मठाधिपती होते.महाराष्ट्रात कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले.लोकांना अध्यात्मिक ज्ञान दिले. वसंतगड संस्थान हे एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र आहे.जिथे सदगुरू जनार्दन महाराजांनी अनेक वर्ष सेवा केली.सध्या त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे शिष्य संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर समर्थपणे पुढे नेत आहेत.तेही कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत. वसंतगड संस्थान दरवर्षी पंढरपूरला पालखी सोहळा काढते,ज्यामध्ये संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर मार्गदर्शन करतात. हा दिंडीसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे वसंतगड संस्थानने काढलेला पंढरपूर दिंडी सोहळ्याचे शनिवार दिनांक २१ जून रोजी प्रमोद पाटील तसेच रमेश पाटील या पाटील बंधूंच्या योगदानातून पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत साकारलेल्या दत्त मंदिरात सायंकाळी सहा वाजता आगमन झाले. यावेळी उंब्रज,कळंत्रेवाडी परिसरातील वारकरी सांप्रदायात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी उंब्रज येथील चौबुर्जी परिवार,विठ्ठल भक्त,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.दरम्यान, ठीक सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाल्यानंतर आरती,नामस्मरण,चिंतन, ध्यानधारणा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.विणेकरी भानुदास आटोळे यांनी अन्नदानासाठी योगदान दिले.रात्री मुक्काम करून पहाटेचे स्नान,काकड आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा सकाळी ठीक सात वाजता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.दत्त मंदिर कार्य कमिटीचे उपाध्यक्ष रमेश पाटील तसेच संचालक मंडळ यांनी पालखी सोहळ्याची अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्था केली होती.उंब्रज येथील समस्त चौबुर्जी परिवार तसेच परिसरातील वारकरी संप्रदायाचे या पालखी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, उपस्थित भाविकांनी आम्हाला जरी पंढरीला यायला मिळालं नाही तरी आमचा पांडुरंगाला नमस्कार सांगा अशी भावनिक साद घातल्यामुळे पालखी सोहळ्याचे वातावरण अधिकच भावनिक बनले होते…!




