
सोकावलेल्या वैरणचोरांचं करायचं काय..?
(खाली मुंडी..वर पाय)
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील शेतकऱ्यांच्या शेतातून वैरण चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. सोकवलेले हे वैरण चोर शेतातील वैरण फस्त करत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आपले पशुधन जगवायचे कसे? हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या सोकावलेल्या वैरण चोरांचं करायचं काय..? खाली मुंडी..वर पाय..अशा उद्विग्न प्रतिक्रिया पशुपालक शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. हे वैरण चोर आपल्या बापाचे शेत असल्याच्या अविर्भावात बिनधोकपणे बांधावर,शेतामध्ये घुसून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वाढवलेल्या चारा वर्गीय पिकांवर डल्ला मारत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे सोकावलेले वैरण चोर परगावचे नसून स्थानिक रहिवासी आहेत.
कित्येक वेळा काही शेतकऱ्यांना वैरण चोरताना रंगेहाथ सापडल्यानंतर अनेकदा काही संयमी शेतकऱ्यांनी मध्यस्थी करून चोरींच्या प्रकरणांवर पडदा टाकत आल्यामुळे मुद्द्यावरून गुद्द्यावर येता येता राहिल्याचे येथील शेतकरी सांगतात.वैरण चोरताना सापडल्यानंतर काहीतरी थातूरमातूर सांगून परत असे करणार नाही. असे म्हणून वेळ मारून नेणे आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे थोडे दिवस वातावरण शांत झाल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातील वैरणीवर डल्ला मारणे अशाच प्रकारे या वैरणचोरांनी आजवर आचरण केल्याचे दिसून येते. दुसऱ्याच्या शेतातील वैरणीवर बिनधोकपणे हक्क सांगून डल्ला मारीत वैरण मालकाची जनावरे उपाशी ठेवून स्वतःची जनावरे जगवण्यात कसली आलीय कर्तबगारी? कोणता पुरूषार्थ? सर्व काही विनासायास,फुकट मिळावे या हव्यासापोटी वैरणचोर हा शिक्का,बिरूदावली समाजाकडून माथ्यावर मारून घेत तो मी नव्हेच या अविर्भावात समाजात ताठ मानेने वावरणारे हे वैरणचोर निर्लज्जम सदासुखीच म्हणावे लागतील. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वैरण चोरीला गेली तो शेतकरी हळहळणारच,शिव्या शाप देणारच अशा पराकोटीच्या हळहळीची,शिव्या शापांनी युक्त अशी वैरण आपल्या जनावरांना घालून त्यातून मिळणारे दूध तुमच्या लेकरा बाळांना आरोग्य तसेच त्या दुधापासून मिळणारा पैसा हा तुमच्या कुटुंबाला सुख-समृद्धी कदापिही देऊ शकत नाही. उलट शेतकऱ्यांचे शिव्या शाप,हळहळ तुमच्या कुटुंबाला रसातळाला नेऊ शकतात यात तीळमात्र शंका नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी खत पाणी घालून कष्टाने पिकवलेल्या वैरणीवर डोळा ठेवून आयता डल्ला मारणाऱ्या भुरट्या,फुकट खायला सोकावलेल्या,नतदृष्ट भामट्या वैरणचोरांनो अजून वेळ गेली नाही.आता तरी सुधरा. वेळीच तुमच्या कुजक्या,सडक्या मेंदूला ताळ्यावर आणा.म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची राहील.नाहीतर तुमच्या त्रासाला वैतागलेले शेतकरी एक दिवस तुमच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे चार फटके टाकून तुमची इभ्रत चव्हाट्यावर मांडल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की…!
अंथरूण पाहून पाय पसरावेत
स्वतःची जनावरे स्वतःच्या जमिनीतून पिकवलेल्या चाऱ्यावरती जगवण्याची आपली कुवत,ऐपत,मानसिकता नसेल तर कशाला जनावरे पाळायची? त्यामुळे आपले अंथरूण पाहून पाय पसरणे कधीही हितकारक असते.




