
अंधारवाडीत ‘उमेद’ चा जागर
(प्रभात फेरी,मशाल फेरीने महिलांमध्ये नवचैतन्य)
रघुनाथ थोरात
अंधारवाडी,ता.कराड येथील प्रगती महिला ग्राम संघाने शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी गावातून प्रभात फेरी,मशाल फेरी काढून उमेद च्या पीआयपी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात केली आहे. ग्रामसंघातील महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब,गरजू,वंचित कुटुंबांना सक्षम करण्यासाठी महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून व्यापक लोकसहभागाच्या आधारावर सर्व समावेशक विकास साधला जात आहे. कराड तालुक्यातील हे अभियान तालुका व्यवस्थापक निलेश पवार आणि प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवले जात आहे. या पाच दिवसीय प्रक्रियेमध्ये प्रभात फेरी, घर भेटी,गावाचा नकाशा तयार करणे,मशाल फेरी अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाची सखोल माहिती घेऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक वर्गीकरण केले जात आहे. सर्वेक्षणात कुटुंबांची एकूण संख्या,मध्यम गरीब,गरीब,अति गरीब व स्थलांतरित कुटुंबांची संख्या, समूहांशी जोडलेली व न जोडलेली कुटुंबे, एस इ सी सी यादीतील व यादी बाहेरील कुटुंबांची माहिती संकलन होत आहे.मारुती मंदिरापासून गावच्या कमानी पर्यंत काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये जवळपास ७० महिलांनी उपस्थिती दाखवली.तसेच जानाई मंदिर ते कुंभाराळीतून कमानी पर्यंत काढण्यात आलेल्या मशाल फेरीमध्ये जवळपास १०० महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रेरिका अस्मिता थोरात यांनी पीआयपी सर्वेचा उद्देश व प्रक्रिया यावर माहिती दिली. कृषी सखी मेघा दुटाळ यांनी प्रास्ताविक तर प्रेरिका अस्मिता थोरात यांनी आभार मानले.यावेळी ग्राम संघाच्या अध्यक्षा विजया बर्गे, सचिव सविता बर्गे,कोषाध्यक्ष साधना यादव, प्रेरिका अस्मिता थोरात, कृषी सखी मेघा दुटाळ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



