
सावरघर गावाची एकजूट…
(पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची वज्रमुठ…)
रघुनाथ थोरात

गणेशोत्सव काळात मुर्त्यांच्या विसर्जनामुळे नद्या,विहिरी,ओढे या जलस्तोत्रांचे होणारे वाढते जलप्रदूषण लक्षात घेता शासनाकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील सावरघर येथील ग्रामस्थांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्याचा एकमुखी निर्णय घेत येथील २६ कुटुंबांनी त्यांच्या गणेशमूर्ती ग्रामपंचायत कार्यालयात जमा केल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी जी एस आतार तसेच सरपंच जगन्नाथ सप्रे यांनी मूर्ती स्वीकारलेल्या आहेत.सावरघर हे गाव तारळी प्रकल्प बाधित गाव असून ते चोरे या गावापासून एक किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.दरम्यान, शासनाच्या पर्यावरण पूरक उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत सावरघर ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे पंचायत समितीने कौतुक केले असून तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही सावरघर ग्रामपंचायतचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.



