Uncategorized

महामार्गावर सापळा रचून तळबीड पोलिसांची धडक कारवाई

(विदेशी दारूसह युवक ताब्यात)

तळबीड पोलिसांचा महामार्गावर सापळा
(विदेशी दारूसह युवक ताब्यात)

रघुनाथ थोरात

राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तळबीड पोलिसांनी गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तासवडे गावाच्या फाट्यावर सापळा रचत धडक कारवाई केली. महामार्गावरून संशयित हालचाली करणाऱ्या दुचाकीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, दारूचा साठा व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाढत्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई प्रविण जयवंत गायकवाड (ब. नं.१८७५, तळबीड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव सुखदेव कोरडे (वय २५, रा. गजानन हौसिंग सोसायटी, गोवारे, ता. कराड, जि. सातारा) हा आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची काळ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड (क्र. एम एच ५० डी १२६९) वरून परवानगीशिवाय विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आला.

जप्त मुद्देमाल

पोलिसांनी एकूण सुमारे १९ हजार ४०० किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. यामध्ये विविध ब्रँडच्या ९० मि.ली., १८०मि.ली., ५०० मि.ली. व ६५० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचा समावेश आहे.
जप्त साठ्यात ग्रॅन्ड मास्टर कॅनबेरी होडका, ग्रीन लेबल व्हिस्की, ओल्ड मंक रम, इम्पेरिअल ब्लू, रॉयल चॅलेंज, मास्टर डिलाईट, रॉयल ग्रीन, मॅकडोनाल्ड, मुंबई मल्ट, रॉयल स्टॅग तसेच टुबर्ग, किंगफिशर व लंडन पिल्सनर स्ट्रॉंग बिअरच्या बाटल्यांचा समावेश आहे.
याशिवाय अंदाजे ३० हजार किमतीची हिरो मेस्ट्रो मोपेड (क्र.एम एच ५० डी १२६९) देखील जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्रीमती राजश्री पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, PSI प्रशांत पाटील, ASI आनंदा रजपूत, पोलीस हवालदार योगेश भोसले, आप्पा ओंबसे, पोलीस नाईक कुपदीप कोळी पोलीस शिपाई प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार, अभय मोरे, मारुती बाकले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे करीत आहेत.
तळबीड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button