

जनाची नाही,निदान मनाची तरी…!
(कळंत्रेवाडी निर्मलग्रामला गालबोट)
रघुनाथ थोरात
समाजात निर्लज्जपणे वावरणाऱ्या प्रवृत्ती ह्या सदासुखी असतात. म्हणून त्यांना निर्लज्जम सदासुखी असे म्हटले जाते.सर्वकाही करून अंगलटी आले की,तो मी नव्हेच अशा पद्धतीने हात वर करून चोराच्या उलट्या बोंबा मारत मोकळे होतात.असेच काहीसे प्रकार निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त मौजे कळंत्रेवाडी येथे वारंवार घडत आहेत.घरोघरी सार्वजनिक शौचालये असूनही गावातील काही अपप्रवृत्तींकडून पवित्र नदी घाट, माऊली देवस्थान परिसर आदि सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्याचे प्रकार काही वर्षांपासून होत आहेत.त्यामुळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. गावातील अपप्रवृत्ती कडून होणारे हे घाणेरडे प्रकार संयमी गावकऱ्यांनी आजपर्यंत सहन देखील केले आहेत. उत्तरमांड नदी काठावरील पवित्र अशा नदी घाटावर दशक्रिया विधी,गणपती विसर्जन केले जाते.गावातील स्त्रिया या ठिकाणी कपडे धुण्याकरता येत असतात.परंतु, सडका मेंदू असलेल्या या घाणेरड्या अपप्रवृत्तींमुळे या परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. बंधाऱ्याच्या भिंतीलगत नदी घाटाकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवर बिनधोक, निर्लज्जपणे शौचास बसणाऱ्या या टोणग्यांना मनाची नाही निदान जनाची तरी लाज असायला हवी.माणसाच्या जन्माला येऊन यांचे वर्तन मात्र जनावरांपेक्षा खालच्या दर्जाचे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कपडे धुण्यासाठी येणाऱ्या स्त्रियांना अक्षरशः नाक मुठीत धरून या ठिकाणी ये-जा करावी लागत आहे.त्यामुळे मानसिक कुचंबनेबरोबरच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे.गत दोन वर्षांपूर्वी अनंत चतुर्थीच्या कालावधीत घाणेरड्या नतदृष्ट अपप्रवृत्तीने नदीघाटावरील पायऱ्यांवर शौचास बसून राडारोडा केला होता.त्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजाने नदीपलीकडील चरेगावच्या हद्दीत गणेश मूर्तींचे विसर्जन करावे लागले होते. अनंत चतुर्थी तोंडावरती आली आहे.त्यामुळे या ठिकाणी गणेश विसर्जन होणार याची पुरेपूर कल्पना असताना अशा पवित्र ठिकाणी शौचास बसून परिसराचे पावित्र्य भंग करणाऱ्या,इतक्या निच्चतम पातळीवर जाऊन दुराचार करणाऱ्या गलिच्छ प्रवृत्तीस काय म्हणावे?शब्दही अपुरे पडतील.दरम्यान,गत आठवड्यात अपघाती मृत्यू झालेल्या गावातील एका युवकाचा आज दशक्रिया विधी होता.त्यावेळी जमलेल्या गावकऱ्यांना नदी घाटावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शौच केल्याचे दिसून आले.परंतु,हतबल मानसिकतेने गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी दशक्रिया विधी पूर्ण केला.यावेळी गावकऱ्यांसह परगावहून आलेल्या पाहुण्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागला.गावातील युवकाचा झालेला अपघाती मृत्यू,आज झालेला दशक्रिया विधी या गोष्टी नदी घाटावर शौचास बसणाऱ्या टोणग्याला माहीत नाहीत का? या गोष्टींची कल्पना असून सुद्धा दुराचारी वागण्याने त्याच्या उच्चतम निर्लज्जपणाची,अमानवीय वागण्याची कल्पना येते.परंतु, उगीच कुठे नादाला लागता म्हणून गावकरी हे सर्व प्रकार निमूटपणे सहन करीत आहेत. परंतु,गावकऱ्यांचा हा संयम ही त्यांची कमजोरी नक्कीच नाही तर त्यांनी दाखवलेला सुसंस्कृतपणा आहे. त्याचाच याने वेळोवेळी गैरफायदा घेतला आहे.परंतु,गावच्या पवित्र ठिकाणी शौचास बसून परिसराचे पावित्र्य भंग करण्याबरोबरच नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अपप्रवृत्तीला गावकऱ्यांनी वेळीच धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावता कामा नये..!
बसणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने…!
बसणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने.. असे म्हणतात. परंतु,या प्रसंगात बघणाऱ्यांनी न लाजता धाडसाने पुढे जाऊन बसणाऱ्याची गचांडी पकडून हाग्यामार द्यावा जेणेकरून निर्लज्ज टोणग्याला जन्माची अद्दल घडेल…
धार्मिक विधी,सणासुदीच्या तोंडावर होतेयं घटनांची पुनरावृत्ती…!
सदरची आसुरी आनंद घेणारी अपप्रवृत्ती जाणून-बुजून दशक्रिया विधी,अनंत चतुर्थीच्या तोंडावर नदी घाटावर खुलेआम शौचास बसत असल्यामुळे या गलिच्छ,निंदनीय घटनांची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे या परिसराचे पावित्र्य भंग होण्याबरोबरच गावकऱ्यांना नाहक मानसिक त्रास होत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.




