सरकारची स्मार्ट सौर योजना सुरू.बघा माहिती, फक्त 2,500 रुपयांत घरावर बसवता येईल सोलार?

मुंबई ( प्रतिनिधी ) – वाढत चाललेले विज बिल माहगडी वीज त्यातही वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत, राज्य शासनाने स्मार्ट सौर योजना ही गरजू व गरीब लोकांसाठी सुरू केलेले आहे आणि ती कमी वीज वापर करणाऱ्या कुटुंबासाठी खूपच लाभदायक ठरत आहे.
ही अडचण दूर करण्यासाठी आणि हरित ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापरणारे घरगुती ग्राहक वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावेत आणि त्यांचे मासिक वीज बिल जवळपास शून्यावर यावे.
स्मार्ट सौर योजनेचे स्वरूप कसे आहे?
स्मार्ट सौर योजना महावितरणमार्फत राबवली जात असून पात्र लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप प्रकल्प बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि राज्य सरकारची स्मार्ट सौर योजना यांचे एकत्रित अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे सोलार प्रकल्पाचा एकूण खर्च पाहता तब्बल ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सोलार प्रकल्प बसवणे सहज शक्य होणार आहे.या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना फार कमी पैसे भरावे लागणार आहेत. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना सोलार प्रकल्पासाठी फक्त २ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंतच रक्कम भरावी लागणार आहे.
उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना आजपर्यंत सोलार प्रकल्प महाग वाटत होता, त्यांच्यासाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे.या योजनेमुळे केवळ वीज बिलात बचत होणार नाही, तर पर्यावरणालाही मोठा फायदा होणार आहे. सौर ऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही, कार्बन उत्सर्जन कमी होते आणि निसर्गाचे संरक्षण होते. याशिवाय घरावर तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला विकता येणार असल्यामुळे काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही योजना केवळ खर्च वाचवणारी नाही, तर भविष्यात आर्थिक मदत करणारीदेखील ठरणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
स्मार्ट सौर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी ठरवण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापरणारे घरगुती ग्राहक, स्वतःच्या घराचे छत असलेले नागरिक आणि महावितरणचे घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक गरीब कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.
अर्ज कसा कराल?
अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी ठेवण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी महावितरण किंवा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र, वीज बिलाची प्रत, घराच्या मालकीचे कागद, बँक खात्याची माहिती आणि पीएम आवास योजनेचा लाभ असल्यास त्याचे प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. पात्रता तपासल्यानंतर मान्यताप्राप्त विक्रेत्यामार्फत सोलार प्रकल्प बसवला जाणार असून नेट मीटर लावल्यानंतर वीज वापर सुरू करता येणार आहे.
महावितरणने नागरिकांना स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी कोणत्याही दलालांच्या किंवा खोट्या आश्वासनांच्या भूलथापांना बळी पडू नये. योजनेबाबतची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळच्या महावितरण कार्यालयातूनच घ्यावी. योग्य माहिती घेऊन अर्ज केल्यास स्मार्ट सौर योजना गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी वीज बिलमुक्त घर, स्वयंपूर्ण ऊर्जा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा मजबूत आधार ठरणार आहे.

