पाटण आगाराचे वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात, वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते कामाशी एकरूप… प्रवाशाची दोन लाखांची बॅग सुखरूप…
(प्रवासी राम झोरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत केला सत्कार)

पाटण आगाराचे वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात, वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते कामाशी एकरूप…
प्रवाशाची दोन लाखांची बॅग सुखरूप…
रघुनाथ थोरात
आपण स्वीकारलेल्या पेशाशी एकरूप होत आपणावर असलेल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करून सामाजिक लौकिक मिळवणारी व्यक्तिमत्व समाजात फारच दुर्मिळ असतात. जनमानसात आपल्या कामाचा ठसा उमटवून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करणाऱ्या अशा दुर्मिळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी गावचे सुपुत्र तथा सध्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या पाटण आगारामध्ये वाहतूक नियंत्रक पदी सेवा बजावणारे श्री हणमंत आप्पासो थोरात तसेच पाटण आगाराचे वाहतूक निरीक्षक श्री प्रशांत तुकाराम मोहिते होय. आपले वरिष्ठ अधिकारी वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कठीण प्रसंगात दाखवलेली समसूचकता तसेच कार्यतत्परतेमुळे एका प्रवाशाची दोन लाख रुपये रोकड असलेली बॅग सुखरूप प्रवाशाला मिळाली अन् प्रवाशासह त्याच्या कुटुंबाचाही जीव भांड्यात पडला.
दिनांक २८ मार्च,वार शनिवार, आगार कार्यालयातील भिंतीवर टांगलेल्या घड्याळ्यात दहाचे ठोके पडले अन् घामाने डबडबलेल्या भितीयुक्त चेहऱ्याने एक प्रवासी साहेब साहेब करत धावतच कंट्रोल केबिनच्या काउंटरवरती आला. समोर कंट्रोलरच्या खुर्चीत बसलेल्या हणमंत थोरात यांनी त्यांना धीर देत नेमकं काय घडलंय ते सांगा?असे अस्थायीपणे विचारल्यानंतर सदर प्रवाशाने सांगितलेला सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे..
साहेब.. मी राम झोरे.. जवरातवाडी गावचा रहिवासी आहे. मुंबईला चाललो होतो. परंतु, पाटण मुंबई गाडीत बसण्याऐवजी नजरचुकीने कोल्हापूर-चिपळूण या गाडीत बॅग ठेवली आणि राहिलेले सामान आणायला गेलो,असता परत येऊन पाहतो तर सदर गाडी फलाटवरून निघून गेली होती. सर्व प्रवासी आले म्हणून वाहकाने गाडी केव्हाच मार्गस्थ केली होती. साहेब त्या बॅगेत माझे दोन लाख रुपये आहेत. आता मी काय करू? डोळ्यात अश्रू,दाटून आलेला कंठ, दुःखाने भरलेले अंतःकरण आणि घामाने डबडबलेला भितीयुक्त चेहरा परिस्थितीचं गांभीर्य सांगून जात होता. वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात यांनी राम झोरे यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत प्रथम त्यांना मानसिक आधार दिला. काळजी करू नका तुमची बॅग एसटी कर्मचाऱ्याच्या हातात पडल्यानंतर त्यातील एकही पैसा कोठे जाणार नाही याची मी हमी घेतो असे म्हणत राम झोरे यांना आश्वस्त केले.अचानक ओढावलेल्या या बाक्याप्रसंगी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न करता ही गंभीर बाब आपले वरिष्ठ वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते यांच्या कानावरती घातली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार घटनेचे गांभीर्य ओळखून कोयनानगरच्या एसटी कंट्रोलला संपर्क करून पाटण कडून येणाऱ्या एसटींची तपासणी करण्यात आली.परंतु, हाती काहीच लागले नाही. तोपर्यंत कोल्हापूर चिपळूण ही गाडी कोयनानगर स्टॅन्ड वरून केव्हाच चिपळूणच्या दिशेने निघून गेली होती.त्यानंतर चिपळूण आगारात संपर्क साधला असता चिपळूण डेपोचे स्टाफ मेंबर कोल्हापूर चिपळूण गाडीतून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान,मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क साधला असता गुलाबी रंगाची बॅग सदर गाडीमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर बॅग ताब्यात घेऊन चिपळूण आगारात जमा करण्यात आली. त्यानंतर राम झोरे यांना चिपळूणला पाठवण्यात आले. दरम्यान, योग्य ते सोपस्कार पार पडल्यानंतर ओळख पटवून दोन लाख रुपये रोकड असलेली ती बॅग चिपळूण आगार व्यवस्थापनाने राम झोरे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर झोरे हे चिपळूण मधूनच मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, रात्री ठीक नऊ वाजता वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात यांनी झोरे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून बॅग मिळाली आहे का? याबाबतची खातरजमा करून घेतली. त्यावेळी राम झोरे यांना गहिवरून आले. मुलाच्या लग्न बस्त्यासाठी दोन लाख रुपये घेऊन मी मुंबईला चाललो होतो. माझा एक मुलगा मुंबई पोलीस मध्ये सेवा बजावत असून दुसरा मुलगा इंजिनीयर आहे. तुमच्या कार्यतत्परतेमुळे माझी कष्टाची कमाई दोन लाख रुपये मला सुखरूप परत मिळाले.तुमचा मी अत्यंत ऋणी आहे. तुमच्यासारखी प्रामाणिक व्यक्तिमत्व समाजात अत्यंत दुर्मिळ आहेत.देव तुमचं भलं करो.अशी कृतज्ञता वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात यांच्याशी फोनवरून बोलताना राम झोरे यांनी व्यक्त केली. चार ते पाच दिवसानंतर राम झोरे हे मुंबईहून परतल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून पाटण आगारात आले.
भरल्या कंठाने.. शब्द ना फुटती..
कृतज्ञते प्रति.. आसवे दाटती..
अशीच काहीशी परिस्थिती राम झोरे यांची कृतज्ञता व्यक्त करताना झाली होती. तुमच्या समय सुचकतेमुळे, कार्यतत्परतेमुळे माझी कष्टाची कमाई मला परत मिळाली.. तुमच्या कार्यकर्तुत्वाला माझा सलाम..
अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त करत राम झोरे यांनी वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात तसेच वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते यांचा सत्कार केला..
आपण स्वीकारलेल्या पेशाशी प्रामाणिक राहून अविरतपणे निस्वार्थी भावनेने कार्यरत राहण्यामुळे समाजात नावलौकिक वाढतो पाटण आगाराचे वाहतूक नियंत्रक हणमंत थोरात तसेच वाहतूक निरीक्षक प्रशांत मोहिते यांनी आपल्या कार्यशैलीतून सिद्ध केले आहे, यात तिळमात्र शंका नाही..!
लोकदवंडी न्यूज मीडिया ग्रुपच्या वतीने त्यांना त्रिवार मुजरा…!



