Uncategorized

आवं गाडीवान दादा…जरा दमानं

(ह्यो हायवे न्हवं..ह्ये वागणं बरं नव्हं..लै वंगाळ अपमान हुईल बरं का)

आवं गाडीवान दादा…जरा दमानं
(ह्यो हायवे न्हवं..ह्ये वागणं बरं नव्हं..लै वंगाळ अपमान हुईल बरं का)

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील वार्ड क्रमांक दोन व तीन या दोन वार्डांना विभागणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर हल्ली धूम स्टाईलचा थरार वाढलाय. त्याचबरोबर या रस्त्यावरून चारचाकी वाहनधारक सुद्धा हल्ली भारधाव वेगाने गाड्या चालवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी गंभीर अपघाताच्या धोक्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आवं गाडीवान दादा..जरा दमानं..ह्यो हायवे न्हवं..ह्ये वागणं बरं नव्हं..लै वंगाळ अपमान हुईल बरं अशा खुमासदार प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

गतिरोधक बसवण्याच्या मागणीला ग्रामपंचायतीकडून केराची टोपली…!

सदर रस्त्यावरील संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता या ठिकाणी गतिरोधक बसवणे बाबत तत्कालीन ग्रामसेवक तसेच सरपंच यांना दिनांक १६ जुलै २०१९ रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते.परंतु,अद्यापही या निवेदनावरती ठोस कार्यवाही झालेली नसल्याने या निवेदनाला ग्रामपंचायत प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे सिद्ध होते.

धूमस्टाईल दुचाकीस्वार.. बेफाम चारचाकीस्वार एखाद्याचा जीव गेल्यानंतर सुधारणार का?

या रस्त्यावर वावरणारे धूमस्टाइल दुचाकीस्वार तसेच बेफाम चारचाकीस्वार अपघातामध्ये एखाद्या अबाल वृद्धाचा जीव गेल्यानंतरच सुधारणार का? यांना सुधारण्यासाठी एखाद्याला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागणार का? असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.

चारचाकीतील बेफाम पाहुणेरावळे..दुचाकीवरील धूमस्टाईल मित्रमंडळी…!

या गल्लीत चारचाकीतून येणारे पाहुणेरावळे तसेच दुचाकीवरून येणारे मित्रमंडळी अगदी बेफाम होत आपली चारचाकी तसेच धूमस्टाईलने आपली दुचाकी चालवत असल्याचे चित्र या रस्त्यावर आढळून येत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

आवं गाडीवान दादा..जरा दमानं..लै वंगाळ अपमान हुईल

या रस्त्यावरून प्रवास करताना आवं गाडीवान दादा..जरा दमानं..नायतर लै वंगाळ अपमान हुईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार रघुनाथ थोरात यांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीने गतिरोधक बसवून भविष्यातील मोठी दुर्घटना टाळावी…!

ग्रामपंचायतीने सदर रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवून भविष्यातील मोठी दुर्घटना टाळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार रघुनाथ थोरात यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

वार्डातून निवडून दिलेले सदस्य या प्रश्नी लक्ष घालणार का…!

सदर वॉर्डातील नागरिकांनी निवडून दिलेले सदस्य या प्रश्नामध्ये लक्ष घालणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार रघुनाथ थोरात यांनी उपस्थित केला आहे.

आता लक्ष ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे…!

सदर रस्त्यावर गतिरोधक बसवावेत म्हणून लेखी निवेदन देऊन जवळपास सहा वर्ष उलटून गेली आहेत. निदान आता तरी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या लेखी निवेदनाला न्याय मिळणार का? असा प्रश्न निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला असून यावरती ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

चौकट

काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती..!

या गल्लीत राहणारा मतिमंद मुलगा शंभूराज थोरात हा रस्त्याकडेला खेळत असताना अचानकपणे एक चारचाकी भरधाव वेगाने आली.परंतु, कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत त्याला उचलून घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु,चारचाकीतून भरधाव वेगाने आलेल्या पाहुण्याची चांगलीच तंतरली होती.अक्षरशः त्याची बोबडी वळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.डोक्याला फुटलेला घाम भीतभीतच पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करत अखेर तो गाडीत बसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button